लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि त्यांच्या एका साथीदारावर त्यांच्याच पक्षातील एकाला मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तुषार जयसिंग गाडे (वय ३२, रा. शाहुनगर, चिंचवड) या तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे (वय ४०, रा. पिंपळे निलख) आणि त्यांचे सहकारी किरण जोगदंड (वय ३४, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडे आणि कामठे दोघेही एकाच पक्षाशी संबंधित आहेत. गाडे यांनी कामठे यांच्या विरोधात समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट टाकली होती. त्यामुळे जोगदंड यांनी गाडे यांना शिवीगाळ केली. गाडे यांना पुन्हा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेताना मागील वेळेसारखे कोणतेही वेडेचाळे करू नये, अशी सूचना जोगदंड यांनी केली होती. त्यावर गाडे यांनी कामठे आणि मी मित्र आहोत, आपण आपसात समजूत काढू असे म्हटले. याचा राग आल्याने जोगदंड यांनी त्यांना चापट मारली. कामठे यांनीही त्यांना फोनवर धमकी देत माझ्या कार्यक्रमाला येऊ नकोस अन्यथा बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.