पुणे : ओळखीतील सराफाकडून उधारीवर घेतलेल्या आठ लाख २२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदाराविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदारासह त्याच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिकाची औंध परिसरात सराफी पेढी आहे. सराफ व्यावसायिक भवानी पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे. पोलीस हवालदाराची सराफाशी ओळख होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हवालदाराने सराफी पेढीतून आठ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे नंतर परत करतो, असे त्याने सराफ व्यावसायिकाला सांगितले होते.
सराफ व्यावसायिकाने हवालदाराकडे उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक करांडे तपास करत आहेत.
ही बाब संबंधित सराफ व्यावसायिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर हवालदाराला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने ओळखीतील एका महिलेकडून ७३ तोळ्यांचे दागिने, तसेच तिच्या पतीकडून १७ लाख रुपयांची रोकड बतावणी करून घेतली होती. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने सांगितले होते. पैसे आणि दागिने परत करतो, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने दागिने, पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक केल्याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात जगतापविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस दलात झालेली शिक्षा लपविण्यासाठी पोलीस आयुक्तालायील लिपिकाशी संगनमत करून सेवा पुस्तिकेतील पान फाडून तेथे दुसरे पान चिटकविल्याच्या आरोपावरून हवालदारासह पोलीस आयुक्तालयातील लिपिकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदाराला याप्रकरणात अटक करण्यात आली होती.