पिंपरी : शहरातील १०८ सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिवर्धकांचा (डीजे) आवाज भोवणार आहे. पोलिसांनी मर्यादेपेक्षा जास्त आवाज असलेल्या या मंडळांच्या ध्वनिवर्धक आवाजाच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून खटले दाखल करण्यात येणार आहेत.ढोल-ताशा पथके, ध्वनिवर्धकांच्या भिंती यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीत सहभागी १०८ मंडळांच्या ध्वनिप्रदूषण पातळीबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केलेल्या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात ५५, तर रात्री ४५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, तर रात्री ७० डेसिबल ध्वनिपातळी राखणे आवश्यक आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, ध्ननिवर्धकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. डेसिबलची मर्यादा केवळ नियमापुरतीच राहिल्याचे दिसून आले. पोलिसांनी घेतलेल्या ध्वनिवर्धकांच्या नोंदीची सहायक पोलीस आयुक्तांकडून चौकशी होईल. नोंदी कोणत्या भागातील आहेत, तिथे आवाजाची मर्यादा किती निश्चित केली आहे. शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची मते आणि आवाज पातळीचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून सहायक पोलीस आयुक्तांकडून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. यानुसार संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर खटले नोंदवले जाणार आहेत. संबंधितांवर दोन ते पाच लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड दौऱ्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू; कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी लवकरच होणार मेळावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ठाण्यांनुसार नोंदणी झालेली मंडळे

पिंपरी पोलीस ठाणे १०, चिंचवड चार, भोसरी ३७, एमआयडीसी भोसरी चार, चाकण दोन, तळेगाव दाभाडे नऊ, वाकड २१, हिंजवडी १६ आणि निगडी पाच अशा १०८ मंडळांच्या मिरवणुकीतील ध्वनिवर्धकाच्या आवाजाच्या नोंदी घेतल्या आहेत.

ध्वनिवर्धकांचा आवाज जास्त असलेल्या १०८ मंडळांच्या नोंदी घेतल्या आहेत. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करून खटले दाखल केले जातील.- स्वप्ना गोरे,पोलीस उपायुक्त (गुन्हे),पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय