पिंपरी : वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकण औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, कामगार, नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील कार्यालयावर गुरुवारी पायी मोर्चा काढला. ‘रस्ता नाही उद्योगनगरला, प्रकल्प जातील गुजरातला’, ‘तत्परता कर घेताना, उशीर का रस्ता देताना’, ‘नको आश्वासन, नको पर्याय, तत्काळ रस्ता हाच उपाय’, ‘पुरे झाले राजकारण, चाकणकरांचे होतेय मरण’, ‘कोंडीमुक्त चाकण होणार कधी, आम्ही चाकणकर फक्त मतदानापुरतेच का?, ‘वाहतूक कोंडी मुक्त चाकण झालेच पाहिजे’, अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली.

चाकण कृती समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुपारी साडेबारा वाजता या पायी मोर्चाला सुरुवात झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह स्थानिक नागरिक, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते. पीएमआरडीए स्थापन झाल्यापासून केवळ रुंद रस्त्यांचे आरक्षण कागदावर मिळाले आहे. प्रत्यक्षात मात्र असे काही झाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘चाकण एमआयडीसी दीड लाख कोटींपेक्षा अधिक महसूल शासनाला देत आहे. त्याअनुषंगाने सुविधा दिल्या पाहिजेत. वाहतूक कोंडीमुळे चाकणचा श्वास गुदमरतो आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे कोंडीचा प्रश्न सुटत नाही. येथील कोंडीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा संस्थांचा सहभाग आहे. या शासकीय संस्थामध्ये समन्वय नाही. रेल्वे, मेट्रो, रस्त्यांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (काॅम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) सहा वर्षांपासून बनविण्यात येत असल्याचे सांगितले जाते. हा आराखडा तयार करून त्यानुसार काम करावे. पालकमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानंतर काही अतिक्रमणे दूर झाली. पण, त्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी उन्नत मार्गाची (एलिव्हेटेड) निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून काम सुरू करावे’.

‘कोंडीमुळे नागरिकांचे जीव जात आहेत. उद्योजक, कामगार, विद्यार्थी कोंडीने त्रस्त असतानाही अतिशय धिम्या गतीने कामे सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणांनी योग्यवेळी कोंडीची दखल घेतली नाही, असा आरोप आमदार काळे यांनी केला. दरम्यान, चाकण आणि औद्याेगिक परिसरातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी विविध उपाय याेजना सुरू आहेत. पुढील काही दिवसांत रस्त्यांसह विविध ३०० काेटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे आयुक्त योगेश म्हसे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

समृद्धी महामार्ग होतो, मग चाकणमधील का नाही?

नाशिक फाटा ते चाकण, खेड हा रस्ता सन २००० साली पूर्ण झाला. चाकण चौकात एक मोठा पूल उभारण्याऐवजी दोन लहान पूल उभारले. २०२२ पर्यंतच्या वाहतुकीचे नियोजन करून हा रस्ता केला होता. पण, सन २०१५ मध्येच नियोजन कोलमडले आणि कोंडीस सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवारांनी दौरा केल्यानंतरही काहीच काम झाले नाही. उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. समृद्धी महामार्ग दोन ते अडीच वर्षांत होतो. पण, चाकणमधील महामार्ग का होत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केला.

प्रवेशद्वारावर ठिय्या

मोर्चा प्रवेशद्वारावर येताच पोलिसांनी अडवला. निवेदन देण्यासाठी आयुक्त दालनात जाऊन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यावर शिष्टमंडळाने जावे, असे पोलिसांनी सूचविले. प्रशासनाने खाली येऊन निवेदन स्वीकारावे. त्यानंतर शिष्टमंडळ चर्चेला आयुक्तांच्या दालनात जाईल. लोकप्रतिनिधी, उद्योजक, कामगार चालत येवू शकतात, तर आयुक्त निवेदन घेण्यासाठी दालनाच्या खाली उतरू शकत नाहीत का, असा सवाल डॉ. कोल्हे यांनी केला. त्यानंतर प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. काही वेळाने डॉ. कोल्हे यांच्यासह शिष्टमंडळाला पीएमआरडीएच्या कार्यालयात सोडण्यात आले. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले आहे.