पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चाकण, म्हाळुंगे एमआयडीसी भागात नव्याने दोन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांची संख्या २४ होणार आहे. तसेच तीन उपायुक्त, सहा सहायक आयुक्त पदांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या तीन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, गुन्हे शाखा, मुख्यालय आणि वाहतूक शाखा यासाठी प्रत्येकी एक असे सहा उपायुक्त आहेत. वाहतूक शाखा उपायुक्त पदासाठी अपर पोलीस आयुक्त पद अवनत करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सहा पोलीस उपायुक्त उपलब्ध आहेत. नव्याने तीन उपायुक्त पदांच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आठ उपायुक्त उपलब्ध होणार आहेत. सध्या १२ सहायक आयुक्त, तसेच एक वायरलेस विभागाचे सहायक आयुक्त अशी १३ पदे आहेत. त्यात आणखी सहा सहायक आयुक्त पदांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता १८ सहायक आयुक्त आणि एक बिनतारी संदेश विभाग (वायरलेस) सहायक आयुक्त अशी १९ पदे उपलब्ध होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत तीन परिमंडळ आहेत. त्यामध्ये २२ पोलीस ठाणे आहेत. चाकण दक्षिण आणि उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी या दोन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीनंतर पोलीस ठाण्यांची संख्या २४ होणार आहे. तीन परिमंडळांमध्ये प्रशासकीय ताण वाढणार असल्याने परिमंडळांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. चौथ्या परिमंडळाच्या मंजुरीबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला देखील लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयुक्तालयांतर्गत अपर पोलीस आयुक्तांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील एक पद अवनत केले आहे. त्यामुळे सध्या एकच अपर आयुक्त पद कार्यरत आहे. उपायुक्तांनी तीन पदे मंजूर झाल्यानंतर उपायुक्तांची संख्या पुरेशी होईल. त्यानंतर अवनत केलेले पद पुन्हा पूर्ववत करून अपर पोलीस आयुक्तांची दोन पदे होणार आहेत.
चाकण दक्षिण, उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. तीन उपायुक्त, सहा सहायक आयुक्त पदांना देखील मंजुरी मिळाली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.