पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मानापमान नाटय़ घडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली.  रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या शहराध्यक्षांना व्यासपीठावर बसण्यास जागा न दिल्याने त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेत सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. अशा प्रसंगांमुळे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला. त्यांनी थेट ‘नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे’ अशा शब्दांत महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिल्याने कार्यकर्ते अवाक् झाले.

अजित पवार यांच्या उपस्थितीत काळेवाडीत झालेल्या मेळाव्याला  बनसोडे यांची गैरहजेरी प्रकर्षांने जाणवली. आमदार बनसोडे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होतील असा दावा केला होता. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला गेली. शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बनसोडे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतरही मेळाव्याला बनसोडे गैरहजर होते. बनसोडे हे शहराबाहेर असून, त्यांनी अजित पवार यांना कल्पना दिली होती, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

हेही वाचा >>>रावेरमधून लढण्यास रोहिणी खडसेंचा नकार, शरद पवारांबरोबर पुण्यात बैठकीनंतर स्पष्टीकरण

दुसरीकडे व्यासपीठावर स्थान न दिल्याने आरपीआयच्या आठवले गटाने बैठकीतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला. तसेच सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. त्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत हे भाषण संपवून पुढच्या दौऱ्यावर निघाले होते. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सामंत यांना घेराव घातला. शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे यांना डावलण्यात आले. असे असेल तर आम्ही का थांबावे, असा सवाल केला. नजरचुकीने घडले असेल, असे सांगत सामंत यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कांबळे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांना भाषणाचीही संधी देण्यात आली.

नकारात्मक बोलणाऱ्यांनी बाहेर जावे!

मेळाव्यात नकारात्मक कोणीही बोलायचे नाही. केवळ सकारात्मक सूचना करायच्या, नकारात्मक बोलणाऱ्यांनी जेवण करावे आणि बाहेर पडावे. नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे, अशी तंबीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे कार्यकर्ते अवाक् झाले. नकारात्मक बोलणाऱ्यांकडे माईक दिला जात नव्हता. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मविआ’पेक्षा आपण पाठीमागे

मावळमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची लढत झाली. या वेळी परिस्थिती बदलली असून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काम केल्यास मावळ, पिंपरी, चिंचवडमधून दोन लाख मताधिक्य मिळेल. महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या अगोदर जाहीर झाला आहे. त्यांचा प्रचाराचा एक दौरा पूर्ण झाला असून, आपण पाठीमागे आहोत. महायुती म्हणून आपल्याला संयुक्तपणाने बूथप्रमुखांची बैठक घेतली पाहिजे, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.