पुणे : जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चितीसाठी पुण्यातील मोदीबागेत सोमवारी खलबते रंगली. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. मात्र रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केले. जयंत पाटील यांनीही इच्छुकांबरोबर चर्चा झाली असून, मंगळवारी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले.
रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण उमेदवार असेल, याबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले होते. त्यातच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा वाढला होता.
हेही वाचा : खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी दुपारी खलबते रंगली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह रोहिणी खडसे यांनी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. रावेरमधील उमेदवाराच्या नावाची घोषणा मंगळवारी केली जाईल. या मतदारसंघातून माझ्या उमेदवारीचा प्रश्नच येत नाही. इच्छुकांसाठी मी आग्रही असून यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. त्यानुसार उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
सन्मान की अगतिकता?
एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात ही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे काही संभ्रम असण्याचे कारण नाही. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश हा त्यांचा सन्मान की अगतिकता, याचे उत्तर तेच देऊ शकतील. मी कोणाच्या विरोधात प्रचार करणार नाही. तर माझा प्रचार माझ्या पक्षासाठी असेल, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. वडील दुसऱ्या पक्षात गेले, याचे निश्चितच वाईट वाटते. मी एकटी पडलेली नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासमवेत आहेत, असेही त्या म्हणाल्या.