पुण्यात एका कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीकेचे बाण सोडले. त्याचबरोबर शिवसेनेलाही खडे बोल सुनावले. चिपी विमानतळाबाबत त्यांना प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण केलं आहे. तसेच केंद्राने सर्व परवानग्या दिल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांची आज बैठक झाली.त्यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. “राज्यात फेव्हिकॉल सरकार आहे. या सत्तेचा फायदा हा फक्त राष्ट्रवादीला झाला आहे. सत्ता अनपेक्षित मिळाली आहे, त्याची मजा चाखतायत.”, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दुसरीकडे संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नाही अशी भाजप पुणे शहर अध्यक्षांनी भूमिका घेतली आहे.त्याला शिवसेना पुणे शहर प्रमुखांनी प्रत्युत्तर म्हणून राऊत साहेब गणेशोत्सवात येणार आहेत. तेव्हा आम्ही स्वागतासाठी तयार आहोत, असं सांगितलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की,संजय राऊत पुण्यात येण्याबाबत आमच्या अध्यक्षांनी जे मत मांडलंय, त्यामुळे त्यांच्या डोक्यात काहीतरी निश्चित असणार आहे.

“महाराष्ट्र भाजपाने फक्त एवढंच स्पष्ट करावं की….”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

या अगोदर विदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं होतं.