पुणे : ‘गेल्या ७० वर्षांच्या नेहरू-गांधी युगात देशाची अस्मिता रसातळाला गेली होती. आपल्या संस्कृतीविषयीची हीन भावना घालवून संस्कृतीच्या अभिमानाची भावना निर्माण करण्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते. शंभर वर्षांच्या प्रचारकांच्या अनेक पिढ्यांतून एक युगप्रवर्तक मोदी निर्माण झाले,’ असे मत स्वामी गोविंददेव गिरी यांनी मांडले.गोखले संस्थेच्या काळे सभागृहात भाजपचे राज्य प्रवक्ता प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘युगप्रवर्तक नरेंद्र मोदी : ७५ वर्षांची राष्ट्र समर्पित जीवनकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुनीत जोशी या वेळी उपस्थित होते.
संघप्रचारकांची जीवनकथा कधी प्रसिद्ध होत नव्हती. ती चरित्रे प्रेरणेचे स्थान आहे. त्यामुळे ती लोकांपुढे येणे आवश्यक असल्याचे सांगून गिरी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातून नरेंद्र मोदी यांनी प्रेरणा घेतली. किती तरी प्रचारकांना जवळून पाहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या सिंहासनावर बसले तो सुवर्णक्षण होता. हिंदुत्वाची महान भावना त्यांनी जागृत केली. त्यानंतर राम मंदिराची स्थापना हा सुवर्णक्षण होता. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. एकही दिवस सुटी न घेता वर्षानुवर्षे काम करणारा पंतप्रधान देशाला लाभावा, हे या देशाचे भाग्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आहेत. नेतृत्त्वासाठीचे गुण त्यांनी कमावले.’
‘काय करायचे हे मोदींना स्पष्ट’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता, आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम होत आहे. १९८२ ते ९५ अशी १३ वर्षे मी प्रचारक म्हणून गुजरातमध्ये काम केले. त्या काळात मोदी यांचा सहवास लाभला. मोदी यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मुख्यमंत्री झाल्यावर आमदार होण्याचे ते वेगळे उदाहरण ठरले. त्यानंतर ते तीन वेळा पंतप्रधान झाले. आतापर्यंतच्या तीन टप्प्यात वेगवेगळे काम केले. पहिल्या टप्प्यात मुलभूत गरजा, दुसऱ्या टप्प्यात राम मंदिर, कलम ३७० असे अनेक वर्षे प्रलंबित विषय मार्गी लावले. आता २०४७ पर्यंत देशाला पुन्हा वैभवाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. काय करायचे आहे ते मोदी यांना अगदी स्पष्ट आहे,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.