एके काळी सायकलींचे शहर आणि पेन्शनरांचे नंदनवन अशी ओळख असलेले पुणे आता जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी होणाऱ्या शहरांत चौथ्या स्थानी, तर देशातल्या १३१ प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट शहर झाले आहे. सायकलींची जागा आता दुचाकी, मोटारींनी घेतली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सदोष आहे. अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण याबाबत ‘परिसर’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांच्याशी विनय पुराणिक यांनी साधलेला संवाद.
वाहतूककोंडीची नक्की कारणे कोणती?
अतिक्रमण, दीर्घकालीन पायाभूत सुविधांबाबत नियोजनाचा अभाव आणि विशेषत: वाहनचालकाकडून वाहतुकीच्या नियमांना दिलेली तिलांजली या कारणांमुळे अपघात, वाहतूककोंडी, वाहतूक मंदावण्यासारखे प्रकार होतात. उपलब्ध पायाभूत सुविधा वाहनांच्या वेगाने होणाऱ्या वाढीला तोंड देऊ शकत नाहीत.
पर्यावरणावर कोणते परिणाम झाले?
पुणे हे देशातल्या १३१ प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे, जे राष्ट्रीय वातावरणीय हवेच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करत नाही. गर्दी, रस्ते अपघात आणि वायुप्रदूषण या समस्यांच्या त्रिकोणीय समस्येमुळे ‘ग्रीन हाउस’ वायू उत्सर्जन वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. काँक्रिटीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे आणि हिरवळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही समस्या वाढत आहे, ज्याला ‘शहरी उष्णतेचे बेट’ असे नाव पडले आहे.
मानवी जीवनावर कोणते विपरीत परिणाम होतात?
वाहनातील धुराचे उत्सर्जन वेगाने वाढत चालले आहे. वाहनांच्या धुरातून निघणारे ‘पीएम २.५’ किंवा ‘पीएम १०’ असे अतिसूक्ष्म कण आरोग्यासाठी हानिकारक आहेत. ते आपल्या शरीरात खोलवर गेल्याने केवळ श्वसनाचेच आजार नव्हे, तर स्मृतिभ्रंश, अपस्माराचे झटके अशा आरोग्य निर्माण होऊ शकतात. पर्यावरणीय बदलामुळे प्रतिकारक क्षमता कमी होऊन स्थूलपणा, मधुमेह आणि इतर आजारांना आमंत्रण दिले जात आहे.
शहरातील वाहतुकीचे भविष्य कसे असेल?
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसोबत ग्रामीण भागात नदीकाठ आणि टेकड्यांवरून रस्ते बनवण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे हिरवाई आणखी कमी होत आहे. शहरातील वृक्षतोडीचे एक प्रमुख कारण म्हणजे रस्ता रुंदीकरण. ज्यासाठी शेकडो जुनी मोठी झाडे तोडली जात आहेत. परंतु, रस्ते बांधून वाहतूक सुरळीत करता येत नाही. अधिक रस्ते अधिक लोकांना गाडी चालवण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे पुन्हा गर्दीची पातळी वाढते. त्याला ‘प्रेरित वाहतूक’ म्हणतात.
यात स्थानिक प्रशासनाची भूमिका काय असावी?
रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी, सुलभ आणि पूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्यावर कमीत कमी वाहने येण्यासाठी उपाययोजना करणे हा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यानुसार धोरणांची अंमलबजावणी करणे, शहराची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) अधिक सक्षम करून बसची संख्या वाढविणे. उदाहरणार्थ, केंद्र सरकार प्रतिलाख लोकसंख्येमागे किमान ५० बसची शिफारस करते.
पुणे महानगरातील लोकसंख्या सुमारे १ कोटी असेल, तर जवळपास पाच हजार पीएमपी बसची आवश्यकता आहे. बाजारमूल्य अधिभाराची (सेस) आवश्यकता आहे. वाहनतळाच्या धोरणात बदल करणे महत्त्वाचे आहे. पुणे महापालिकेने २०१७ मध्ये मंजूर झालेले धोरण अद्याप कागदावरच आहे. वाहनतळाचे शुल्क वाढविल्यास लोकांना गाडी चालवण्यापासून परावृत्त करता येऊ शकते. काही परिसर (जसे की पुण्याच्या मध्यवर्ती-पेठांचा भाग) वाहनमुक्त करता येईल. मेट्रोचे जाळे विस्तारत असून, घरातून मेट्रोपर्यंत प्रवासी पोहोचला पाहिजे. त्यासाठी स्थानकावरून नियोजित ठिकाणावर जाऊन पुन्हा माघारी येईपर्यंतची सुलभ सेवा निर्माण केल्यास नक्कीच नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेकडे आकर्षित होतील.
नागरिकांची भूमिका काय असावी?
चालणे, सायकल चालवणे, सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर या बदलामुळे नक्कीच आणखी जीवनमान उंचावेल. आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि पर्यावरणीय संकटाच्या त्रासापासून काहीसा बदल करता येईल. सुरक्षित, अधिक राहण्यायोग्य शहर हवे असेल, तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक तरतुदींमध्ये याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. वर्षानुवर्षे आपल्याला रस्ते, उड्डाणपूल आणि पूल यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. चांगले पदपथ, सायकल लेन आणि बससाठी मात्र तसे होते नाही. जनतेने असे प्रश्न व्यवस्थेसमोर वेळोवेळी उपस्थित करून बदल करून घेतला, तरच या जंजाळातून मुक्तता होईल. अन्यथा, शहराची अधोगती निश्चित आहे.