पुणे : सर्व समाज एकत्रित राहिला पाहिजे. मात्र, यापुढे हक्कांसाठी लढावेच लागेल. हक्कासाठी थांबता येणार नाही. हक्कांवर कोणी गदा आणणार असेल तर शांत बसणार नाही, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त समता भूमी येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. त्यावरून ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमी भूमीवर भुजबळ यांनी आता हक्कासाठी लढावेच लागेल, हक्कासाठी थांबता येणार नाही, असे स्पष्ट केले.राज्यात नवी वर्णव्यवस्था निर्माण केली जात आहे. आता लायकी काढली जात आहे. नागपूर येथील रामटेक मध्ये दलित तरुणाला मारहाण झाली. त्यावरून नवी वर्णव्यवस्था निर्माण केली जात आहे, हे दिसून येते. यापूर्वीची वर्णव्यवस्था वेगळी होती. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. सर्व समाज एकत्रित राहिला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये, मात्र अन्याय होत असेल तर तो झुगारताही आला पाहिजे.

हेही वाचा >>>ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट : ससूनमधील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षक, समुपदेशक गजाआड

शिंदे समिती बरखास्तीचा पुनरुच्चार

 निजामशाही आणि वंशावळीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे समितीचे काम संपल्याने ही समिती बरखास्त करावी, अशी मागणी भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाल्यानंतर खाडाखोड केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. निजमाशाही आणि वंशावळीनुसार प्रमाणपत्रे मिळालेले ओबीसीमध्ये आपोआप समाविष्ट झाले आहेत. त्यांचे जातपडताळणी करण्याचे काम झालेले नाही.  जिल्ह्याजिल्ह्यांतील कुणबी शोधण्याचे काम समितीने करणे अपेक्षित नाही. या समितीचे काम संपले आहे. प्रमाणपत्रात खाडाखोड केलेल्यांना ओबीसीमध्ये ग्राह्य धरता येणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा – विखे

ओबीसीबाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.   विखे पाटील म्हणाले, की सध्या समाजात ओबीसी – मराठा असा निर्थक वाद सुरू आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. लोक त्यांच्याविषयी आदराने बोलतात. मात्र भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन ती मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

Story img Loader