पुणे : ‘सरसकट कर्जमाफी केल्यास बँकांना फायदा होणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तूर्त कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, योग्य वेळी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल,’ असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यशदा येथील ‘प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी भारताच्या उत्पादन क्षेत्राचा पुनर्रचना आराखडा’ उद्घाटन कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना प्रथम मदत करायची की कर्जमाफीचा निर्णय घेऊन बँकांचा फायदा करायचा, हा सध्याचा प्रश्न आहे. कर्जमाफी केल्यानंतर पैसे थेट बँकांना मिळणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही. या परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पोहोचणे आवश्यक आहे.’

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता तातडीने करावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ बच्चू कडू यांच्या आंदोलनापूर्वी बैठक बोलाविण्यात आली होती. चर्चेतून प्रश्न सुटतील, असे त्यांना सांगितले होते. कडू यांनीही मान्यता दिली होती. मात्र, बैठकीला येणार नसल्याचे त्यांनी कळविले. चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या संपर्कात आहेत. कडू यांनी वेगवेगळे प्रश्न मांडले आहेत. केवळ आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रश्न सुटणार नाहीत. ते सोडविण्यासाठी चर्चा करून कृती आराखडा करावा लागेल.’

‘कडू यांच्या आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांनाही त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. नागरिकांना वेठीस धरून त्रास होईल, अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत. आंदोलनात अनेक अपप्रवृत्ती शिरण्याचा धोका असतो. आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, असे मी म्हणत नाही. मात्र, रेल रोकोसारख्या गोष्टी करून दिल्या जाणार नाहीत,’ असेही फडणवीस म्हणाले.

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य शासन सकारात्मक आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. कर्जमाफीही योग्य वेळी दिली जाईल. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना प्रथम मदत करायची की, बँकांचा फायदा पाहायचा, हा मुख्य प्रश्न आहे. कर्जमाफी केली तर बँकांना पैसे मिळणार आहेत. शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रथम पैसे पोहोचले पाहिजेत. कर्जमाफी करणार नाही, अशी सरकारची भूमिका नाही. शेतकऱ्यांना मदत सुरू झाली असून कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल.’ असे त्यांनी सांगितले.