पुणे : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदाच्या हंगामात गावरान चिकूच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारात चिकूची आवक निम्याहून कमी झाली आहे. चिकूचा हंगाम दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होतो. एप्रिल महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. हंगाम सुरू होऊन महिना झाल्यानंतर बाजारात अपेक्षेएवढी चिकूची आवक होत नाही. हंगाम सुरू झाल्यानंतर मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज १५ ते २० टन चिकूची आवक होत असते.

यंदा फळबाजारात दररोज चार ते पाच टन एवढी आवक होत आहे. गावरान चिकू गोड असतात. त्यामुळे अन्य जातीच्या चिकूपेक्षा गावरान चिकूला मागणी जास्त असते. चिकूवर प्रक्रिया करून त्याचा पल्प तयार केला जातो. आइस्क्रीम उत्पादकांकडून चिकूच्या पल्पला चांगली मागणी असते. यंदा गावरान चिकूला पल्प निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी कमी आहे. घरगुती ग्राहक आणि ज्युस विक्रेत्यांकडून चिकूला मागणी आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील चिकू व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

हेही वाचा >>> दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सुवर्णपाळणा

चिकूचे दर तेजीत

सातारा जिल्ह्यातील फलटण तसेच बारामती तालुक्यातील चिकूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. चिकूची आवक कमी होत असल्याने यंदाच्या हंगामात दर तेजीत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो गावरान चिकूला १५ ते ४० रुपये दर मिळत आहेत, असे चिकू व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

वातावरणातील बदलामुळे चिकूच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. नेहमीच्या तुलनेत झाडांवर होणारी चिकूची फळधारणा निम्म्याहून कमी झाली आहे. फळधारणा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकूला जास्त दर मिळत आहे. येत्या पंधरा दिवसांत चिकूची आवक आणखी वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अप्पा जगदाळे, चिकू उत्पादक शेतकरी, बारामती