पुणे : ‘भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसंघर्षात छुपी मदत करून चीनने जवळपास ३० अब्ज डॉलरहून अधिक किमतीची शस्त्रास्त्रे पाकला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनही पाकिस्तानइतकाच आपला मोठा शत्रू आहे. आपल्या जवानांचे रक्त सांडण्यास चीनही तितकाच जबाबदार असून, भविष्यात ड्रॅगनलाही धडा शिकवायला हवा,’ असे मत ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ‘भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला?’ या विषयावर हेमंत महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष व तरुण भारतचे समूह संपादक किरण ठाकूर अध्यक्षस्थानी होते.

महानज म्हणाले, ‘युद्धभूमीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या चीनने युद्धसंघर्षात पाकिस्तानला शस्त्रसाठा, तंत्रज्ञान पुरवून मोठी मदत केली. याशिवाय विमानांच्या ट्रॅकिंगसाठी पाकला मदत केल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय जवानांचे रक्त सांडण्याकरिता कारणीभूत असलेल्या चीनला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपण चीनवर आर्थिक बहिष्कार घालायला हवा.’

‘भारताविरुद्धच्या तिन्ही युद्धांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. आपण भारताविरोधात जिंकू शकत नाही, याची जाणीव झाल्यानेच ते छुप्या युद्धाच्या कुबड्या वापरतात. जगाचे लक्ष वेधण्यासाठी पहलगामवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मात्र, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले,’ याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकूर म्हणाले, ‘बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानने शीतयुद्ध केले. भारताला जखमा करणे सुरू ठेवले. बेळगावमध्ये मराठा लाइट इन्फंट्री आहे. पुण्यातसुद्धा सैन्य दलाशी निगडित अनेक संस्था आहेत. ही शहरे राजकीय, सैन्याच्या, तसेच राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने जागृत शहरे आहेत.’