पिंपरी- चिंचवड शहराचं नाव ‘जिजाऊ’नगर करावं या मागणीसाठी भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने पुन्हा एकदा शहरभर फ्लेक्स लावले आहेत. आज राजमाता जिजाऊ यांची ३५० वी पुण्यतिथी असून या निमित्ताने भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. पिंपरी- चिंचवडची ओळख ही अनेकदा ‘पीसीएमसी’ म्हणून करण्यात येत आहे. भविष्यात हेच नाव पडू शकतं हे लक्षात घेऊन शहराला ‘जिजाऊ’ नगर नाव द्यावं अशी मागणी भक्ती- शक्ती प्रतिष्ठान चे महेश बारणे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो फ्लेक्स लावत शहराच नाव ‘जिजाऊ’ नगर करण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरभर ‘पीसीएमसी’ नको ‘जिजाऊ’ नगरच अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड शहराचा नामांतराचा विषय पुढे येत आहे. शहराला जिजाऊ नगर हे नाव देण्यात यावं अशी आग्रही भूमिका भक्ती- शक्ती प्रतिष्ठानने घेतली आहे. याकडे राजकीय नेते कसं बघतात आणि भविष्यात खरच पिंपरी- चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

….म्हणून पिंपरी- चिंचवडच नाव बदलून जिजाऊनगर करावं

मुंबईच बॉम्बे झालं त्याचप्रमाणे पिंपरी- चिंचवडच पीसीएमसी नाव होऊ नये. पीसीएमसी हे नाव इंग्रजी आहे. अनेकदा पिंपरी- चिंचवड हे नाव घेण्याचं टाळून व्यावसायिक किंवा परराज्यातील व्यक्ती पीसीएमसी हे नाव घेतात. यामुळे शहराच्या नावाची ओळख कमी होत असल्याचं म्हणणं महेश बारणे यांचं आहे. शहराचं नाव हे जिजाऊ नगर करण्यात यावं अशी त्यांची आग्रही भूमिका आहे.