पुणे : शहरातील धोकादायक झालेली झाडे, फांद्या तोडण्यासाठी नागरिकांनी दिलेले ३०९ अर्ज मंजूर करण्यात आले असून, आता शहरातील खासगी सोसायटीच्या आवारातील धोकादायक झाड अथवा फांद्या आढळल्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कापण्यात येणार आहेत. मात्र, त्या कामाचा खर्च संबंधित सोसायटीकडून वसूल केला जाणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत उद्यान विभागाने शहरातील विविध भागांत ७४८ ठिकाणी कामे करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी धोकादायक झाडे, फांद्या काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनी दिले. त्यासाठी विविध विभागांसह उद्यान विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्या बैठका देखील घेण्यात आल्या. मात्र त्यानंतरही धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे नीलायम चित्रपटगृह आणि एरंडवणा परिसरात धोकादायक झालेल्या झाडांच्या फांद्या पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेकडे आलेल्या तक्रारीची आणि प्रस्तावांची दखल घेऊन उद्यान विभागाने सर्व अर्ज निकाली काढले आहेत.
पूर्वी धोकादायक झाडे, फांद्या कापण्याची किंवा छाटण्याची परवानगी उद्यान विभागाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून दिली जात होती. त्यामुळे अनेक कामे रखडत होती. महत्त्वाच्या प्रकल्पांनाही याचा फटका बसत होता. त्यामुळे आता धोकादायक झाडे, फांद्या तोडण्याचा परवाना देण्याच्या कामाचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. हे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरील समितीला देण्यात आले आहेत. मात्र, विकेंद्रीकरण करूनही अनेक प्रस्ताव रखडत असल्याच्या तक्रारी अतिरिक्त आयुक्त कार्यालयांकडे आल्या होत्या. दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यानंतर उद्यान विभागाच्या कारभारावर टीका झाली. त्यानंतर उद्यान विभागाने प्रलंबित असलेल्या सर्व ३०९ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. तसेच, महापालिकेच्या वृक्ष छाटणी गाडीने शहरातील ४३९ ठिकाणी धोकादायक फांद्या व झाडांची छाटणी पूर्ण केली आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरातील ७४८ ठिकाणी ही कामे केल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.
पावसाळ्यात धोकादायक झालेल्या फांद्या आणि झाडे आढळल्यास ती काढून टाकण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. खासगी सोसायटीच्या आवारातील धोकादायक झाड, फांद्या आढळल्यास महापालिकेने त्याकडे लक्ष देऊन ते कापून टाकावे. त्या कामाचे बिल संबंधित सोसायटीकडून वसूल करावे, अशा सूचना दिल्या आहेत.ओमप्रकाश दिवटे (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)