पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ ते १७ मे या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांनी २३ मे रोजी शुल्काची रक्कम विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे, तर विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट २६ मे रोजी जमा करायची असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती ऑनलाइन अर्जात घेता येईल. श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) उपलब्ध राहतील. नियमित आणि विलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य मंडळाने नमूद केले आहे.