पुणे : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही दिवसांपासून थांबली असली, तरी सीएनजीच्या दरातील वाढ मात्र दोन महिन्यांपासून कायम आहे. पुणे शहरात सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे. सीएनजीची ही दरवाढ लक्षात घेता आता रिक्षाचे भाडे वाढवून मिळण्याची मागणी रिक्षा पंचायतीच्या वतीने शनिवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात आली.

करातील कपातीपूर्वी पुण्यात पेट्रोल १२० रुपये, तर डिझेलचे दर १०२ रुपयांच्या पुढे होते. शासनाकडून करकपात झाल्यानंतर सध्या हे दर अनुक्रमे ११०.८७ रुपये आणि ९५.३६ रुपये लिटर आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दर स्थिर असले, तरी गेल्या दोन महिन्यांपासून सीएनजीची दरवाढ सुरू आहे. ३१ मार्चला ६८.५० रुपये असलेला सीएनजीचा दर राज्य शासनाने करात कपात केल्यानंतर ६२.२० रुपयांवर आला होता. मात्र, ५ एप्रिलला लगेचच त्यात वाढ होऊन तो ६८ रुपयांवर पोहोचला.

आठवड्यानंतर लगेचच दरात आणखी वाढ झाली असून, १३ एप्रिलपासून शहरात सीएनजी ७३ रुपये किलो झाला. त्यात २० एप्रिलला दोन रुपयांची वाढ होऊन दर ७५ रुपयांवर गेले. २९ एप्रिलला पुन्हा २.२० रुपयांची दरवाढ झाल्याने किलोमागे सीएनजीचा दर ७७.२० रुपयांवर पोहोचला होता. २२ दिवसांच्या कालावधीनंतर २१ मे रोजी त्यात २.८० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन रुपये वाढल्याने शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे.

शहरातील सर्व रिक्षा सध्या सीएनजी इंधनावर चालविल्या जातात. पीएमपीच्या अनेक बसही याच इंधनावर धावतात. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असल्याने अनेक खासगी मोटारीही गेल्या काही दिवसांत सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी ६२ रुपये किलोचा दर असणारा सीएनजी आता ८२ रुपयांवर पोहोचला असल्याने रिक्षा पंचायतीकडून भाडेवाढीची मागाणी करण्यात येत आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा पंचायतीकडून रिक्षा दरवाढीची मागणी

रिक्षा पंचायत सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, “सीएनजीची सातत्याने होत असलेली दरवाढ आणि अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल- डिझेल या इंधनाच्या दरातही गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राहणीमान निर्देशांकातही वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतीने रिक्षा दरवाढीची मागणी केली आहे.”