पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी (१ जुलै) सकाळपासून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तातडीने करोना चाचणी केली. सायंकाळी चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घरातच उपचार घेत आहेत.

ऑगस्ट २०२० मध्ये डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर करोना काळात सलग दोन वर्षे सुटी न घेता त्यांनी जिल्ह्यात काम केले. करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये पुणे जिल्ह्याला कृत्रिम श्वसन यंत्रणा, प्राणवायू आणि ते साठविण्याचे सिलिंडर, प्राणवायू प्रकल्प, लशींचा पुरेसा साठा याबाबत डॉ. देशमुख यांनी उत्कृष्ट नियोजन केले. दोन वर्षांनंतर होणाऱ्या पायी वारी सोहळ्यासाठी देखील जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले होते.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ताप आल्याने करोना चाचणी केल्यानंतर सायंकाळी अहवाल सकारात्मक आला असून घरीच उपचार घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.