पुणे : जिल्ह्यात ४२ अपघातप्रवण ठिकाणे असून, रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि अपघातप्रवण (ब्लॅकस्पाॅट) संदर्भात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात पुणे महानगरपालिका हद्दीत १५, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये २२, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दोन, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या हद्दीत एक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दोन असे एकूण ४२ ब्लॅकस्पॉट आहेत. रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी अल्प तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे डुडी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात प्रवण ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध घालावेत. या ठिकाणी दिशादर्शक फलकांची उभारणी, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे डुडी यांनी सांगितले. गेल्या एक वर्षात जिल्ह्यात झालेल्या अपक्षातांची ठिकाणनिहाय कारणे शोधावीत. या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाला सुरक्षात्मक उपायायोजना करण्यात याव्यात. तसेच खडकवासला धरण परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. रस्ते सुरक्षा जनजागृतीकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.