लोणावळा : ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात कुंडात महाविद्यालय तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. पथकातील स्वयंसेवकांनी कुंडात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह रात्री बाहेर काढला.

रोहन विरेश लोणी (वय २१, मूळ रा. सोलापूर, सध्या रा. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन आणि त्याचे मित्र ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात मंगळवारी फिरायला आले होते. प्लस व्हॅली परिसरातील दुर्गम भागात कुंड आहे. तेथे जाण्यासाठी अवघड वाट आहे. रोहन आणि त्याचे मित्र अवघड वाट पार करुन कुंडातील पाण्यात मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरले. पोहताना दमछाक झाल्याने रोहन कुंडातील पाण्यात बुडाला. रोहन बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती पौड पोलिसांना दिली. पौड पोलिसांनी या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला दिली. पथकातील स्वयंसेवक प्लस व्हॅली परिसरात दाखल झाले.

हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश

तीव्र उताराची अवघड वाट पार करुन स्वयंसेवक कुंडाजवळ उतरले. पथकातील सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, सुनील गायकवाड, योगेश उंबरे, प्रिन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी आदींनी शोधमोहीम राबवून पाण्यात बुडालेल्या रोहनचा मृतदेह सायंकाळी बाहेर काढला.

हेही वाचा – तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या कामावर स्वत:च ठेवा वॉच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायंकाळ झाल्याने अवघड वाटेने मृतदेह रस्त्यापर्यंत आणण्यासाठी पथकातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. अंधारातून चाचपडत रात्री साडेनऊच्या सुमारास स्वयंसेवकांनी मृतदेह ताम्हिणी घाटातील मुख्य रस्त्यावर आणला. मुळशी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमोद बलकवडे, माणगाव आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे शेलार, पौड पोलीस ठाण्यातील कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी शोधमोहिमेत सहभागी झाले होते.