पुणे : शेवाळवाडी-मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, रस्त्यांवर पडलेले खड्डे, ड्रेनेज व्यवस्था, तसेच वाढलेली अतिक्रमणे अशा त्रुटी आढळल्याने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कठोर निर्णय घेतला आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवी खंदारे यांची नियुक्ती करण्याचा आदेश आयुक्त आयुक्तांनी दिला. तसेच, शाखा अभियंता, आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दणका देण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे. आयुक्त राम यांनी शनिवारी सकाळी शेवाळवाडी-मांजरी परिसराचा दौरा करून तेथील सुविधांची पाहणी केली. यामध्ये अस्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण, तसेच नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर बोट ठेवून नाराजी व्यक्त केली.

या भागात असलेल्या समस्यांबाबत संबंधित विभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे आयुक्तांनी विचारणा केली. त्या वेळी समाधानकारक माहिती न मिळाल्याने राम यांनी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची बदली करून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवी खंदारे यांची नियुक्तीचे आदेश काढले.

मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक, तसेच मुकादम या तिघांवर समाधानकारक काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापूर्वीदेखील आयुक्त राम यांनी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली भागाची पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी ड्रेनेज व अतिक्रमण समस्यांवरून सहायक आयुक्त शीतल वाकडे, ड्रेनेज विभागातील उपअभियंता विनायक शिंदे व गणेश पुरम यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली केली होती.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमण या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढील काळात देखील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल.