जात प्रमाणपत्र वैध ठरविण्यासाठी पडताळणी समिती उपायुक्ताची लाचखोरी ; घरात १ कोटी २८ लाख रुपयांची रोकड

ढगे यांच्या निवासस्थानी जाऊन  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली.

पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक लाख ९० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जात पडताळणी समितीचे उपायुक्त नितीन ढगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री पकडले. ढगे यांनी तक्रारदाराकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आठ लाखांची लाच मागितली होती. यापूर्वी त्यांनी तक्रारदाराकडून पाच लाख रुपये स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे. ढगे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीत   १ कोटी २८ लाख रुपयांची रोकड सापडली.

नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०) सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागात उपायुक्त आहेत तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारादाराच्या पत्नीने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता. जात प्रमाणपत्र वैध करण्यासाठी ढगे यांनी तक्रारदाराकडे आठ लाख रुपयांची लाच मागितली होती.

नितीन ढगे यांना पोलीस कोठडी.

ढगे यांच्या निवासस्थानी जाऊन  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. झडतीत एक कोटी २८ लाखांची रोकड, मालमत्तांची कागदपत्रे असा २ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ढगे यांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ढगे यांच्याकडे एक कोटी २८ लाखांची रोकड मिळाली असून एवढी रक्कम कशी आली, यादृष्टीने तपास करायचा आहे. त्यांच्या आवाजाचा नमुना घ्यायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. रमेश घोरपडे यांनी न्यायालयात केली.  अ‍ॅड. विक्रमसिंह घोरपडे यांनी साहाय्य केले. न्यायालयाने ढगे यांना २१ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Committee verification deputy commissioner took bribe to validate caste certificate zws

ताज्या बातम्या