पुणे : महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला, तरी कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा लढविण्याचा ठाम निर्धार काँग्रेसने केला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे लोकसभेच्या जागेबाबत मुंबईत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत पुण्याच्या जागेवर हक्क कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कशी आहे, हे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मुंबईच्या बैठकीत मांडण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पुण्याची जागा काँग्रेसच लढविण्याची आग्रही भूमिका या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याला अनुमोदन देत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पुण्याच्या जागेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. ही जागा काँग्रेसच लढवेल, असे बैठकीत स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेवाढ! १ जुलैपासून अंमलबजावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त ताकद आहे. पक्षाचे दोन आमदार असून ४० नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे, असे पवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसकडूनही मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरू झाली आहे. त्याअंतर्गत पुणे लोकसभेचा आढावा मुंबई येथे शनिवारी सकाळी घेण्यात आला. त्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे लोकसभा जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचा आणि ही जागा लढविण्याचा निर्णय पक्षाच्या मुंबईतील बैठकीत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार नाही. – मोहन जोशी, माजी आमदार