पुणे : राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बँका अडचणीत असल्याने किंवा त्या बंद असल्यामुळे राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली असून, राज्यातील हजारो सेवा सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बँका अडचणीत आहेत किंवा बंद असल्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून होणारा वित्तपुरवठा बंद झाला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या काही जिल्हा बँकांमधून विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्तपुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना हंगामासाठी कर्ज मिळू शकत नव्हते. हंगामासाठी पैसे हवे असतील, तर इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याची बाब शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी राज्यमंत्री मोहोळ यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
कर्जपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या नियमांतील बदलामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांनाही काही निकष पाळून वित्तपुरवठ्याबाबत राज्य सहकारी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.
ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गेली तीन वर्षे नफ्यात आहेत, ज्यांचा एनपीए १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, अशा सोसायट्यांना थेट राज्य सहकारी बँकेकडून वित्तपुरवठा होणार आहे. राज्यात एकूण २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.
कोट
ज्या जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या बँकांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बँकेतून थेट कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गावची सोसायटी सक्षम असेल, तर गावचे अर्थकारणही सक्षम असते. त्यासाठी सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना केली होती. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री.