पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत आणखी ४३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ८ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात करोनाचे एकूण २४२ रुग्ण आढळले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ४३ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका ७ आणि पुणे ग्रामीण १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २५ मेपर्यंत करोनाच्या ७ हजार ३८९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३०० रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक २४८ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या २०९ असून, ८७ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. त्यातील एका रुग्णास मूत्रपिंडविकारासह चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्याला अपस्माराचा आजार होता. चौथ्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा मधुमेहाचा आजार होता, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते २५ मे)
करोना चाचण्या – ७ हजार ३८९
एकूण रुग्ण – ३००
मुंबईतील रुग्ण – २४८
सक्रिय रुग्ण – २०९
बरे झालेले रुग्ण – ८७
रुग्ण मृत्यू – ४
आरोग्य विभागाकडून उपाययोजना ‘राज्यात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यात रुग्णांचा शोध घेण्यासाठी फ्लू आणि श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. शासकीय रुग्णालयांत करोना तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले.