पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात मोटारीमध्ये मागील आसनावर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलल्याप्रकरणी आरोपी आशिष मित्तल आणि अरुणकुमार सिंग यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य, शिक्षेची तीव्रता व आरोपींविरोधात पुरावे, साक्षीदार व व्यापक समाजहिताला बाधा पोहोचण्याची सरकार पक्षाची भीती या सर्व बाबी लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला.

आशिष सतीश मित्तल आणि अरुणकुमार देवनाथ सिंग अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने पोर्शे मोटार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. मोटारचालक मुलगा आणि पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी या सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे या मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्याकरिता विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांच्याशी संगनमत केले. ससून रुग्णालयामधील शिपाई अतुल घटकांबळेमार्फत रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याला आरोपींनी लाच दिली होती. त्या वेळी अरुणकुमारच्या सांगण्यावरून त्याच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याला एका मुलाच्या जागी स्वतःच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी पैसे दिले होते, असे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर १९ ऑगस्ट २०२४ रोजी आशिष मित्तलला पोलिसांनी अटक केली. मात्र, अरुणकुमार हा पसार झाला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शरण आलेल्या अरुणकुमारला ८ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली. या सर्व दहा आरोपींविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मित्तल आणि सिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला.