पुणे : रविवार पेठेतील कापडगंज परिसरात एका इमारतीत शुक्रवारी दुपारी गाय शिरली. इमारतीच्या जिन्यावरून गाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. मात्र, त्यानंतर अरुंद जिन्यातून तिला बाहेर पडता येणे शक्य झाले नाही. रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यांनी भेदरलेल्या गायीची सुटका केल्याने रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले.
रविवार पेठेत गोठे आहेत. या गोठ्यांपैकी एका गोठ्यातून आलेली एक गाय दुपारी बाराच्या सुमारास कापडगंज परिसरातील एका इमारतीत शिरली. जिन्याने गाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. गाय दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने रहिवाशांनी तिला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अरुंद जिन्यातून वळता न आल्याने गाय भेदरली. गाय मोठ्याने हंबरू लागली.
गायीची अवस्था पाहून रहिवाशांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. गायीला जिन्यातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अरुंद जिन्यातून गायीला बाहेर काढणे शक्य नसल्याचे लक्षात आले.त्यानंतर जवानांनी गायीला सुरक्षापट्टे लावले.
दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीपर्यंत गायीला नेण्यात आले. क्रेनचा वापर करून गायीला सुखरूप खाली उतरविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीचे रहिवाशांनी कौतुक केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.