बारामती : ‘आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे’ अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज ‘ असे कॅप्शन टाकून सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाने वंजारवाडी येथील जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी खातरजमा करून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत कायद्याचा बडगा उगारला आहे. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर ‘दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने बारामती तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेश बन्ने यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो. हवा. किशोर वीर हे करत आहेत.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात तसेच एमआयडीसी, सूर्यनगरी परिसरात कोण दादागिरी, दहशत करत असेल तर ९९२३६३०६५२ या क्रमांकावर कळवा. त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस ठाणे.