मोठा शस्त्रसाठा जप्त
पुणे शहरातील गुन्हेगारांना बेकायदेशीर रीत्या देशी बनावटीची पिस्तुले विकणाऱ्या मध्यप्रदेशातील तस्कराला पोलिसांनी पकडले. भारती विद्यापीठ आणि खडक पोलिसांनी धुळे परिसरात ही कारवाई केली. त्याच्याकडून अकरा पिस्तुले, अठ्ठावीस काडतुसे जप्त करण्यात आली.
रमेशसिंग ऊर्फ मनीष चावला (वय ३४, रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) आणि अमर ऊर्फ पप्पू संजय बनसोडे (वय २८, रा. घोरपडी गाव)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडक पोलिसांच्या तपासपथकाने बनसोडेला पकडले. त्याच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली होती. दरम्यान, चावलाने बनसोडे तसेच पुण्यातील काही गुंडांना पिस्तुलाची विक्री केली, तसेच आठवडय़ापूर्वी तो स्वारगेट परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आला होता,अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. चावलाला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. धुळे पोलिसांची या कारवाईसाठी मदत घेण्यात आली. सापळा लावून चावलाला पकडले.
त्याच्याकडून देशी बनावटीची आठ पिस्तुले आणि वीस काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी बनसोडे आणि चावलाकडून अकरा पिस्तुले आणि अठ्ठावीस काडतुसे जप्त केली आहेत.
चावलाने पुण्यातील गुन्हेगारांना पिस्तुलांची विक्री केली असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे, समाधान कदम, अजय थोरात, संतोष मते, अमोल पवार, कुंदन शिंदे, विशाल शिंदे, प्रणव संकपाळ यांनी ही कारवाई केली.
थेरगाव भागात बावीस लाखांची रोकड लुटली
खासगी कंपनीतील रोकड गोळा करून बँकेत भरणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून चोरटय़ांनी बावीस लाखांची रोकड लुटली. थेरगाव भागात ही घटना घडली.
श्रीमंत ज्योतीराम ढाणे (वय ४५, रा. हिंजवडी) यांनी यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाणे हे चेक मेट कंपनीत सुरक्षारक्षक आहेत.
खासगी वित्तीय संस्था, व्यावसायिक, मॉलमधील रोकड गोळा करून ती बँकेत भरण्याचे काम चेकमेट कंपनीकडून केले जाते. मंगळवारी दुपारी थेरगाव भागातील जनलक्ष्मी फायन्सास कंपनीत जमा झालेली बावीस लाखांची रोकड जमा करण्यासाठी चेकमेट कंपनीतील कर्मचारी मंगेश पाडाळे, योगेश ओझरकर निघाले होते. थेरगाव भागात डांगे चौकात चेकमेट कंपनीची जीप रस्त्याच्या कडेला उभी होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा आणि त्याचा साथीदार तेथे आले.
जीपमध्ये बसलेले पाडाळे आणि ओझरकर यांच्या तोंडावर गुंगी येणारा स्प्रे मारून चोरटय़ांनी जीपमधील पिशवीत ठेवलेली रोकड लंपास केली. जीपचालक शिवाजी गवारेंनी चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार चोरटा आणि त्याचे साथीदार भूमकर चौकाच्या दिशेने पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. सागडे तपास करत आहेत.
पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी रोकड आणि दागिने असा दोन लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना धनकवडीतील बालाजीनगर भागात घडली.
पकाजी भोलाजी देवासी (वय ४०, रा. चिंतामणी हाइट्स, बालाजीनगर, धनकवडी) यांनी या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी देवासी सदानिका बंद करून बाहेर पडले. चोरटय़ांनी सदानिकेचे कुलूप तोडून कपाटातील पाच हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ७० हजारांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. मोरे तपास करत आहेत.
कोथरूड भागात रिक्षा चोरटय़ाला पकडले
पुणे स्टेशन भागातून रिक्षा चोरून पसार झालेल्या चोरटय़ाला पोलिसांनी पकडले. कोथरूड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
दिलीप अण्णा जाधव (वय ३३, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. पुणे स्टेशन परिसरातून काही दिवसांपूर्वी जाधवने रिक्षा चोरली होती. कोथरूड भागातून तो मंगळवारी (१८ ऑक्टोबर) तो निघाला होता. जाधवने रिक्षा चोरल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून रिक्षा जप्त करण्यात आली. कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक राधिका फडके, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, हवालदार विलास जोरी, सचिन कुदळे, अश्वजित सोनवणे, प्रशांत गायकवाड, विनायक पाबळे यांनी ही कारवाई केली.