वस्तीचा दादा मीच असे म्हणविणाऱ्या एका गुंडाने अल्पवयीन मुलाला हाताशी धरुन वस्तीतील सहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत परिसरात बुधवारी दुपारीसव्वा दोन वाजता घडली.

सहकारनगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटनेचे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती. या घटनेला काही दिवस झाले नाही तोच दहशतीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कृष्णा सुभाष वैराळ (वय १९, रा.दिग्विजय कॉलनी, संतोष नगर कात्रज) याच्यासह एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सचिन भोसले (वय ३६, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी शेजारी राहत होते. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला ‘मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो’ असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीवर वार केला. परंतु, हा वार चुकवून फिर्यादी घरात पळून गेला. त्यानंतर आरोपीने या परिसरात असणाऱ्या पाच दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर हातातील हत्याराचा धाक दाखवत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक बेरड तपास करत आहेत.