लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दुकानांवरील इंग्रजी नामफलक, पाट्या हटवून मराठी पाट्यांसाठी आंदोलन करुन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, कुलदीप यादव, शाम ताठे, प्रवीण मिसाळ, संदीप माने, प्रवीण सोनवणे, राजेंद्र वागस्कर, दादा साठे, योगेश खडके यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शाही भोज हॉटेलचे मालक ब्येनाराम मनारामजी देवासी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मराठी पाट्या दुकाने, उपाहारगृहांवर लावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मराठी पाट्या न लावल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुणेसह राज्यभरात आंदोलन केले. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करुन काळे फासले. जंगली महाराज रस्त्यावरील शाही भोज हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. इंग्रजी पाटीची तोडफोड केली, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील लेव्हीज शोरुम, शुभम टाइम्स, बुट्टे पाटील ग्रुपने लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे तपास करत आहेत.

आणखी वाचा-अजित पवारांकडून जोरदार हल्लाबोल, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काहींनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स शोरुमच्या इंग्रजी पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वनेंदू घोष यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर तपास करत आहेत.