सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रतिष्ठेचा आणि महागडा असा तंत्रज्ञान विभाग हा निकषांची पायमल्ली करण्यातही आघाडीवरच असल्याचे समोर येत आहे. पायाभूत सुविधांच्या निकषांबरोबरच शैक्षणिक दर्जाबाबत निश्चित करण्यात आलेल्या निकषांचीही पत्रास बाळगली जात नसल्याचे चित्र समोर येत आहे.
विभागाकडून सायंकाळचे अर्धवेळ पदव्युत्तर पदवी (एम.टेक) अभ्यासक्रमही चालवण्यात येतात. हे अभ्यासक्रम चालवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) नव्या निकषांनुसार आवश्यक ठरले आहे. मात्र, मुळात नियमित अभ्यासक्रमांसाठीही पुरेसे शिक्षक नाहीत. तेथे सायंकाळी चालवण्यात येणाऱ्या अर्धवेळ अभ्यासक्रमांची अवस्था अधिकच गंभीर आहे. त्याचप्रमाणे विभागांतील चार विषयांसाठी स्वतंत्र विषय प्रमुख, त्यांच्यासाठी विभागांत स्वतंत्र व्यवस्था, प्रत्येक विद्याशाखेची स्वतंत्र प्रयोगशाळा, एक कार्यशाळा, बॉईज रूम, लेडिज रूम अशा सुविधाही स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एखादी तंत्रशिक्षण संस्था चालवण्यासाठी एआयसीटीईने ठरवून दिलेले जागेचे किमान निकषही पाळण्यात येत नसल्याचे समोर येत आहे.
विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांपैकी दोन विषयांचा अभ्यासक्रमही विभागाकडून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. मेकॅनिकल आणि मटेरिअल या विषयांचा अभ्यासक्रम विभागाने उपलब्ध करून दिलेला नाही.
पदे मंजूर झाली तरीही..
एखाद्या विभागात शिक्षकांची किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तर ‘आम्हाला भरती करण्यासाठी मंजुरीच नाही..’ हे उत्तर देण्यात येते. मात्र अनेक विभागांना पदे भरण्यासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात ती भरली गेली नाहीत. त्यामुळे कालांतराने ती पदे रद्द करण्यात आली. पदांना मंजुरी मिळूनही पदे न भरताच कंत्राटी किंवा तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या आधारे काही विभागांनी आपला कारभार चालवला. आता न भरल्यामुळे पदांची मंजुरी रद्द झाल्यानंतर पुन्हा ‘पदे मंजूरच नाहीत.’ असे कारणच विभागांना मिळाले आहे. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतीतही विद्यापीठाने हीच परंपरा चालवली. दोन वर्षांपूर्वी पदांना मंजुरी घेऊन, जाहिरात देण्यात आली, काही पदांसाठी परीक्षाही घेण्यात आल्या. मात्र कधी आरक्षण, कधी न्यायालयीन वाद, कधी परीक्षेतील चुकांचे वाद अशा विविध कारणांवरून ही पदभरती देखील खोळंबली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2016 रोजी प्रकाशित
प्रतिष्ठेचा तंत्रज्ञान विभाग निकषांची पायमल्ली करणारा
पायाभूत सुविधांच्या निकषांबरोबरच शैक्षणिक दर्जाबाबत निश्चित करण्यात आलेल्या निकषांचीही पत्रास बाळगली जात नसल्याचे चित्र समोर येत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-04-2016 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criteria abuse prestigious technology department