पुणे : विद्युत रोषणाईने उजळलेली मंदिरे, फुलांची आणि रंगबिरंगी पताक्यांची सजावट, उत्सव मंडपामध्ये भजन-कीर्तनासह भक्तिगीतांचे कार्यक्रम आणि ध्वनिवर्धकावरून ऐकू येणारे अभंगांचे सूर अशा उत्साही भक्तिभावाने रविवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंदिरांमध्ये पहाटे महापूजा, अभिषेक, काकड आरती तर, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम रंगले. आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. विठ्ठलनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला होता. मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली होती.
प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती, अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. रविवारच्या सुटीमुळे भाविकांच्या अलोट गर्दीने सिंहगड रस्ता परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री स्वामी बॅग्ज आणि शांतीनिकेतन सेवा संस्थेच्या वतीने विठ्ठलाला प्रिय तुळस, फुलझाडे, औषधी आणि देशी वृक्षांचा समावेश असलेल्या २५ हजार रोपांचे भाविकांना वाटप करण्यात आले. राहुल जगताप, प्रफुल्ल जगताप, दीपक परदेशी, मिथिला जगताप, वैभवी जगताप, प्रणोती जगताप या वेळी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम असलेल्या भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिर आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असलेल्या नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर यांसह नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिर, टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील प्रेमळ विठ्ठल मंदिर, मोती चौकातील पासोड्या विठोबा मंदिर, बाजीराव रस्त्यावरील झांजले विठ्ठल मंदिर, सदाशिव पेठेतील उपाशी विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, साबुदाणा वडा या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मंदिराच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सभामंडपात सायंकाळी अनुजा पंडित यांनी भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
तुका म्हणे…
आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘तुका म्हणे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी संत तुकाराम महाराज रचित अभंगांचे सादरीकरण करत रसिकांना भक्तिरसाचा अनुभव दिला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ हा गजर केल्यानंतर ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘भेटी लागी जीवा, लागलीसे आस’,‘घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे’, ‘विठ्ठल माझी माय, आम्हा सुख उणे काय’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’,‘पद्मनाभा नारायणा’ या रचनांनंतर गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी अजरामर केलेल्या ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाने केळकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना प्रसाद जोशी (पखवाज), कौशिक केळकर (तबला), लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), मंगेश जोशी (तालवाद्य), क्षितिज भट (सिंथेसायझर), धवल जोशी (बासरी) यांनी साथसंगत केली. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी निरूपण केले.
अभंगवाणी
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘अभंगवाणी’ कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर, प्रज्ञा देशपांडे, सचिन इंगळे यांनी विविध संतरचना सादर केल्या. त्यांना राजेंद्र दूरकर, केदार मोरे, नितीन जाधव, अमृता ठाकूरदेसाई-दिवेकर, नीलेश देशपांडे यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निरूपण केले. या कार्यक्रमाचे यंदा २६ वे वर्ष होते.