scorecardresearch

VIDEO: लाल महालात लावणीच्या रिल्सवरून शिवप्रेमींचा संताप, अखेर वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा; म्हणाली, “माझ्याकडून…”

डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत लाल महालात लावणी व्हिडीओ शूट करण्यासाठी जाहीर माफी मागितली आहे.

vaishnavi-patil-lal-mahal 2

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओत तिने माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असं मत व्यक्त केलं आहे.

वैष्णवी पाटील म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रष्ठ जिजाऊंच्या लाल महालात चंद्रा लावणीवर डान्स व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करताना त्यावर वाद होईल असं काहीच माझ्या मनीध्यानी आलं नव्हतं. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ बनवायला गेले होते. कुणाचंही मन दुखावण्याचा, शिवप्रेमींचं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी स्वतः एक शिवप्रेमी आहे. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं.”

“मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ डिलीट केला”

“ज्या क्षणी मला माझ्याकडून चूक झाली हे कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलीट केला होता. परंतू मी तो व्हिडीओ डिलीट करण्याआधीच माझ्या चाहत्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केला. मी सर्वांना तर सांगू शकत नाही, पण मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो व्हिडीओ डिलीट केला. आत्ताही मी माझ्या चाहत्यांना व्यक्तिगतपणे तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत आहे,” अशी माहिती वैष्णवी पाटीलने दिली.

हेही वाचा : लाल महालात लावणी प्रकरण : अभिनेत्री वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल

“सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते”

“माझ्याकडून लालमहालात लावणी व्हिडीओ शूट करण्याची चूक झाली आहे. माझ्या मनात काहीच नव्हतं. मी जाणूनबुजून केलं असंही नाही. असा विचार मी माझ्या स्वप्नातही करू शकत नाही. गाणं चांगलं होतं म्हणून मी तो व्हिडीओ केला. परंतू ही चुकी माझ्याकडून झाली. ही चूक मी मान्य करते. सर्व शिवप्रेमी आणि माझ्या चाहत्यांची मी माफी मागते. तसेच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का बसेल असा माझा हेतू नव्हता,” असंही वैष्णवी पाटीलने नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dancer vaishnavi patil publicly apologies for shooting lavani video in lal mahal pune pbs

ताज्या बातम्या