राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पुढे ढकललेली तारीख, परीक्षेच्या प्रक्रियेसंदर्भात खासगी कंपनीची न्यायालयातील याचिका आदी कारणांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची (एनटीएस) नोंदणी, राज्य परीक्षा परिषदेने डिसेंबरमध्ये थांबवली होती. मात्र पालकांकडून मागणी होत असल्याने पाच महिन्यांनी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नियमित आणि विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येईल.

एनसीईआरटीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्य स्तरावरील परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देता येते. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्यस्तरीय १६ जानेवारीला, तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा १२ जूनला घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र परीक्षा आता पुन्हा नियमित शुल्कासह २२ एप्रिलपर्यंत आणि विलंब शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. परीक्षेची तारीख एनसीईआरटीकडून प्राप्त झाल्यावर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असे परिषदेकडून परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा एनसीईआरटीमार्फत घेतली जाते. १६ जानेवारीला होणारी ही परीक्षा एनसीईआरटीने प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली होती. राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेच्या प्रक्रियेचे काम खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने तांत्रिक कारणास्तव न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर हे प्रकरण मिटले आहे. एनसीईआरटीने परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे राहिले असल्याने पालक विद्यार्थ्यांकडून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला.