लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूचे प्रकरण अधिवेशनात गाजले. या प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय आहे. ३० डिसेंबर १९८९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने २५ डिसेंबर २०१७ पासून प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे.

आणखी वाचा-पिंपरी : सुरक्षित मातृत्व आश्वासन अंतर्गत महापालिकेची आठ रुग्णालये, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना मोफत मिळणार ‘या’ सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणी संग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही. २०१७ ते सन २०२३ या कालावधीत ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. या प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महापालिकेमार्फत कळविण्यात आले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.