पुणे : गेल्या दहा वर्षांत देशाची संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. त्यापैकी सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे. २०२९ पर्यंत संरक्षण साहित्य उत्पादनक्षमता ३ लाख कोटी रुपयांवर, संरक्षण साहित्य निर्यात ५० हजार कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते. देशाच्या लष्कराने स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजवल्याचेही त्यांनी नमूद केले.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या (एसएसपीयू) सहाव्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होते.

पदवी प्रदान समारंभात १ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना कुलपती सुवर्ण पदक, दोन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार, एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उद्घाटन करण्यात आले.

राजनाथ सिंह म्हणाले, वेगाने बदलत्या जगात कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारसह राज्य शासनही कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करत आहे. आजच्या काळात ज्ञानाचे उपयोजन महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.

तसेच ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखांपेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. कुशल युवक असल्यास जगातील कोणतीच शक्ती देशाची प्रगती रोखू शकत नाही.

देशात धर्म, जातीच्या आधारावर कधी भेदभाव करण्यात आला नाही. मात्र, शेजारी राष्ट्राने धर्म विचारून पहलगाममध्ये भारतीय नागरिकांना मारले. आपण त्यांना मारले, तेव्हा धर्म विचारून मारले नाही, तर त्यांचे कर्म पाहून मारले. हा भारत आणि अन्य देशांतील फरक आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरित करणे गरजेचे आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या अद्याप मर्यादित आहे. देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्याने पुढे जात असताना महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात या क्षेत्रातील गुंतवणूक, उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती राज्यात होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

सापाचा प्रवेश, पालकांची नाराजी

कार्यक्रमावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पालकांना पदवी प्रदान कार्यक्रमाला प्रवेश नाकारण्यात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाच्या मंडपात सापाने प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.