पुणे: देशातील प्रमुख महानगरांमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या आलिशान घरांना मागणी वाढली आहे. यंदा नऊ महिन्यांत सात महानगरांमध्ये ८४ हजार ४०० आलिशान घरांची विक्री झाली. एकूण घरांच्या विक्रीत त्यांचे प्रमाण २४ टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घरांची विक्री १९१ टक्क्याने वाढल्याचे समोर आले आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील सात प्रमुख महानगरांतील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील घरांच्या विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा नऊ महिन्यांत सात महानगरांमध्ये एकूण सुमारे ३ लाख ४९ हजार घरांची विक्री झाली. त्यातील २४ टक्के आलिशान घरे आहेत. मागील वर्षी याच कालावधीत एकूण २ लाख ७३ हजार घरांची विक्री झाली होती. त्यात आलिशान घरांचे प्रमाण केवळ १४ टक्के होते.

हेही वाचा… काय सांगताय? पुण्यापेक्षा पिंपरीत स्वस्त कपडे?

मागील वर्षीच्या तुलनेत आलिशान घरांच्या विक्रीत ११५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा नऊ महिन्यांत हैदराबादमध्ये आलिशान घरांच्या विक्रीत सर्वाधिक २६० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. हैदराबादमध्ये यंदा १३ हजार ६३० आलिशान घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री ३ हजार ७९० होती. त्याखालोखाल पुण्यात आलिशान घरांच्या विक्रीत १९१ टक्के वाढ झाली आहे. पुण्यात यंदा ६ हजार ८५० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री २ हजार ३५० होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई, दिल्ली, हैदराबादमध्ये सर्वाधिक विक्री

मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या महानगरांमध्ये आलिशान घरांना सर्वाधिक मागणी दिसून आली. या महानगरांमध्ये एकूण ६३ हजार ३९० आलिशान घरांची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री ३० हजार ८२० होती. विशेष म्हणजे, प्रमुख महानगरांचा विचार करता एकाही ठिकाणी आलिशान घरांच्या विक्रीत घट नोंदविण्यात आली नाही, अशी माहिती अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली.

महानगरांतील आलिशान घरांची विक्री (जानेवारी ते सप्टेंबर)

  • दिल्ली – १३,६३०
  • मुंबई – ३६,१३०
  • बंगळुरू – ९,२२०
  • पुणे – ६,८५०
  • हैदराबाद – १३,६३०
  • चेन्नई – ३,३३०
  • कोलकता – १,६१०
  • एकूण – ८४,४००