राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी पुणे शहराच्या दौर्‍यावर होते. त्यादरम्यान त्यांनी शनिवार पेठेतील मेट्रो कामांची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला असता, अनेक नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर तक्रारींचा पाढाचा वाचून दाखवला. शनिवार पेठ भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. भटक्या कुत्र्यांमुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संभाजी बागेत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. नदीचा भाग अधिक चांगला करावा, अशा समस्या नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. त्या वेळी एक वृद्ध महिला अजित पवार यांच्याकडे येऊन म्हणाली की, दादा, आमच्या भागात कचर्‍याची समस्या अधिक असून, त्याचे नियोजन धंगेकरसाहेबांना करायला सांगा. आम्ही कुठ जायचं? धंगेकर आणि रासने?  या दोघांना कचर्‍याबाबत नियोजन करायला सांगा, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. पण, आज त्याच मतदारसंघातील समस्यांबाबत एका वृद्ध महिलेने थेट अजित पवार यांच्याकडे, “आम्ही आमच्या समस्या घेऊन नेमकं जायचं कोणाकडे” , असा सवालदेखील उपस्थित केला. तर, सध्या रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटामध्ये पुणे महानगर प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

यावेळी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी आज मेट्रो कामांची पाहणी केली. तसेच यावेळी नागरिकांशीही संवाद साधला.” या प्रसंगी त्यांनी काही कामांचे कौतुक केले. तर काही कामांबाबत चांगल्या सूचनादेखील केल्या. त्याचबरोबर येत्या काळात येथील नागरिकांचे प्रश्न निश्चित सुटतील, असे त्यांनी सांगितले.