पुणे :‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या जागतिक पातळीवरील सायकल स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळून जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर जाईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ‘जानेवारी महिन्यात होणाऱ्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे,’ अशी सूचनाही पवार यांनी केली.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या अनुषंगाने पवार यांनी रविवारी विधान भवनात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहर सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, ‘सायकल फेडरेशन ऑफ इंडिया’चे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग या वेळी उपस्थित होते.
‘या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. त्या संदर्भातील कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी,. त्यानुसार आवश्यक तेथील त्रुटींची दुरुस्ती करता येईल, असे पवार यांनी सांगितले.
या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, गतिरोधकाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळविणे, बॅरिकेटिंग आदींच्या अनुषंगाने वेळेत माहिती दिल्यास सर्व पूर्वतयारी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंडकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून, लवकरच मान्यता मिळेल. स्पर्धा यूसीआय आणि सीएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आगामी ऑलिम्पक स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा गणली जाणार आहे. शहरासह पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, पुरंदर आणि बारामती अशी चार टप्प्यांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची मोठी पूर्वप्रसिद्धी आणि स्पर्धेदरम्यानही २५ देशात थेट प्रक्षेपण व्हावे, असा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे, असे डुडी यांनी सांगितले.