पिंपरी : ‘पदपथावर वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे पदपथावर कोणाचीही मोटार, वाहने उभी केली असली तरी कारवाई करावी. आम्ही लावलेली वाहने असली तरी उचलावीत,’असे निर्देश उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणीत अजित पवार यांचा आज (बुधवारी) जनसंवाद सुरू आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून जनसंवादला सुरुवात झाली. प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

तत्पूर्वी पवार यांनी कुंजीर चौक, पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक आणि रस्ते समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण, अव्यवस्थित पार्किंग व महावितरण संबंधित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. पदपथावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. कोणी दमदाटी केली तर कोणाचे ऐकायचे नाही. कोणाचीही मोटार, वाहने उभी केली असली तरी कारवाई करावी. आम्ही लावलेली वाहने असली तरी उचलावीत असे निर्देश पवार यांनी दिले. गृहनिर्माण सोसायटी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळण्यास विलंब होणे असे विविध प्रश्न घेऊन नागरिक जनसंवादमध्ये आले आहेत. अजित पवार संबंधित अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देत आहेत.

भाजपच्या बालेकिल्ल्यात जनसंवाद

चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. चिंचवड मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून या मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे वर्चस्व आहे. माजी आमदार लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. त्यानंतर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे बंधू शंकर जगताप निवडून आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांचा जनसंवाद होत आहे.

विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा

चिंचवडमधील थोपटे लॉन्स येथील जनसंवाद कार्यक्रमास आलेल्या पवार यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेमळ स्वागत केले. पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या शोभेच्या भेटवस्तू तसेच झाडाचे रोप देऊन अजित पवार यांचे स्वागत केले.