लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने गहू, रवा, मैद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. गव्हाचा अतिरेकी साठा करण्यावर बंधने आहेत. तरीही देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीत मागील आठवडाभरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. २८ ते २९ रुपये किलोचा गहू ३० ते ३१ रुपयांवर गेला आहे.

गहू, उपपदार्थांचे व्यापारी, निर्यातदार अनुप शहा म्हणाले, की श्रावण महिन्यापासून सण-उत्सव सुरू होतात. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत रवा, मैद्याला मागणी वाढते. त्यामुळे खासगी मिलचालकांकडून कमी दर्जाच्या गव्हाला मागणी वाढते. या काळात भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) मिलचालकांना गव्हाचा पुरवठा केला जातो.

हेही वाचा… जंगलांना आग लागण्याचे प्रमाण घटले

पण, यंदा एफसीआयकडून अपेक्षित गव्हाचा पुरवठा होत नसल्यामुळे मिलचालकांनी खासगी बाजारातून कमी दर्जाच्या गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात आठवडाभरात ३० रुपयांहून कमी दराने विक्री होत असलेल्या गव्हाच्या किमतीत तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. २८ ते २९ रुपये दराने विक्री होणारा गहू ३० ते ३१ रुपयांनी विक्री होऊ लागला आहे.

हेही वाचा… कैदीच देणार आता कैद्यांना कायद्याचे ज्ञान!

बाजारात ३० रुपयांहून जास्त दराने विक्री होणाऱ्या दर्जेदार गव्हाच्या दरात सध्या कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कमी दर्जाच्या गव्हाच्या दरात वाढ झाल्याने दर्जेदार गव्हाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार एफसीआयकडील गव्हाचा साठा खासगी बाजारात कसा आणते, त्यावरही गव्हाचे दर अवलंबून असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एफसीआयचा गहू पुरवठा कमी

दर वर्षी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खासगी मिलचालकांकडून रवा, मैद्यासाठी गव्हाला मागणी वाढते. वाढीव मागणीनुसार एफसीआयकडून गव्हाचा पुरवठा केला जातो. यंदाही एफसीआयकडून गव्हाचा पुरवठा केला जात आहे, पण तो अपुरा आहे. त्यामुळे मिलचालकांनी खासगी बाजारातून खरेदी वाढवली आहे. त्यामुळे कमी दर्जाच्या गव्हाच्या दरात वाढ झाली आहे, असे गव्हाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले.