प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिराचं अखेर पुढील महिन्यात उद्घाटन होणार आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. ते पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

“या देशात मोदींनी नवभारताची संकल्पना मांडली, त्यांनी नवभारताची मुहूर्तमेढ केली. या नवभारताची सुरुवात अटलबिहारी वाजपेयींनी केली. त्यांनी पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा संकल्प मांडला. अटलजींना एकदा लोकसभेत विचारलं की अटलजी तुमचा समान किमान कार्यक्रम तर जाहीर झाला. पण यात राम मंदिर आणि कलम ३७० नाही. अटलजींना खिजवण्याकरता असं विचारण्यात आलं होतं. त्यावर अटलजी म्हणाले की, आम्ही राम मंदिरही विसरू शकत नाही आणि ३७० ही विसरू शकत नाही. समान नागरी कायदाही विसरू शकत नाही. आज आम्ही २२ पक्षांचं सरकार घेऊन चालत आहोत. हा समान किमान कार्यक्रम २२ पक्षांचा आहे. परंतु, मी दाव्यानिशी सांगू शकतो की, ज्यादिवशी या देशात माझ्या पक्षाचं सरकार येईल, तेव्हा राम मंदिरही बनेल आणि ३७० ही रद्द होईल”, अशी आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.

“ज्या क्षणी मोदींच्या नेतृत्त्वात सरकार तयार झालं पूर्ण बहुमत मिळालं, तेव्हा कलम ३७० ही गेलं आणि २२ तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे”, असं फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज काही लोक विचारतात राम मंदिर तुमची खासगी संपत्ती आहे का? हे तेच लोक आहे जे म्हणायचे मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नहीं बताएंगे. पण तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली. २२ जानेवारीला हिंमत असेल तर अयोध्येमध्ये या. तुम्हालाही रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. रामाचं मंदिर तयार होत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.