लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष चार जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरेंद्र मोंदीशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. काँग्रेस डुबती नाव आहे. देशासाठी काही करायचे असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पवार, ठाकरेंनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भोसरीतील गावाजत्रा मैदानावर शुक्रवारी ( १० मे) ‘विजयी संकल्प’ सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल, विकास डोळस यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-मतदानाबाबत समाजमाध्यमांतील ‘तो’ संदेश चुकीचा; प्रशासनाची स्पष्टोक्ती

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायतीची नसून ही देशाची निवडणूक आहे. देशाला मजबूत, सुरक्षित, विकासाकडे नेऊ शकतो. सामान्य माणसांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करु शकता असा नेता निवडण्याची निवडणूक आहे. वेगवेगळ्या पक्षांची मोठा बांधून महायुती तयार झाली. तर, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ पक्ष एकत्र आले. पण, नेता ठरवू शकले नाहीत. पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगूच शकत नाही. सकाळी नऊ वाजता येणा-या भोंग्याने (संजय राऊत) पाच वर्षात पाच पंतप्रधान निवडू असे सांगितले. हा उद्योग, परिवार नाही. देशाचा नेता निवडायचा आहे. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. मोदी यांना पर्याय नाही. त्यांच्या नेतृत्वात महायुती मजबूत आहे. तिकडे डब्बे नसून सगळे इंजिन आहेत. त्यात बसायला जागा नाही. शिरुरची बोगी मोदी यांच्या इंजिनला जोडावी. त्यानंतर शिरुरला वेगापासून कोणीच वंचित ठेऊ शकणार नाही.

खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगले कलावंत, नाटककार आहेत. पण, ते कलाकारच राहिले, खासदार होऊ शकले नाहीत. चोखंदळ रसिक एखाद्या नाटकाला पहिल्यांदा तिकीट काढून जातो. दुस-यांदा जात नाही. नाटक ‘फ्लॉप’ झाल्याने कोल्हेंना आता संधी मिळणार नाही. निवडणूक आल्यानंतर निवृत्तीची घोषणा करतात. निवडणूक झाल्यानंतर नाटकच करतात. जनतेला विसरुन जातात. पाच वर्षे कोठे होतात, हे जनता कोल्हेंना विचारत आहे, असेही फडणवीस म्हणाले. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त केली जाईल. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे नियोजन केले आहे. तीन-तीन मजले रस्ते तयार केले जाणार असून विकास आराखडा तयार झाला आहे. आधुनिक शहर तयार करण्याचा प्रयत्न आहे. रेडझोनचाही प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

आणखी वाचा-पुण्यातील सभेत राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “या माणसाने कधीही…”

पाच पक्ष बदलेले कोल्हे महागद्दार

खासदार डॉ. अमोल कोल्हे दिल्लीला गेले ते परत मतदारसंघात आले नाहीत. गावभेट दौरा, कोणाला भेट नाही. फोन उचलत नाहीत. ८० टक्के खासदार निधी वापराविना परत गेला. विकासाचा मुद्दा नसल्याने खोटे-नाटे आरोप करत असून दिशाभूल करत आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी एकनिष्ट असल्याचे सांगत आहेत. पाच पक्ष बदलेल्या कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोल्हे महागद्दार आहेत. ते आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवत आहेत. मी वीस वर्षे धनुष्यबाणासोबत निष्ठेने राहिलो. राष्ट्रवादीला जागा गेल्याने सहमतीचा उमेदवार म्हणून मी घड्याळाच्या चिन्हावर लढत असल्याचा खुलासा आढळराव यांनी केला. २०१९ मध्ये महेश लांडगे यांचे काम करु नका असे निर्देश तत्कालीन नेतृत्वाने दिले होते, असा दावाही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसरीतून लाखाचे मताधिक्य देणार

सत्ता नसताना अडीच वर्षे आम्ही फार संघर्षात काढली. सत्ता आल्यानंतर प्राधिकरणाचा साडेबारा टक्यांचा प्रश्न निकाली काढला. शास्तीकर माफ केला. जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य देण्याची ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.