मागील काही काळापासून पुण्यात कोयता गँगचा सुळसुळाट झाला आहे. कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळक्याकडून काही तरुणांवर हल्ला केला आहे. अशा घटनांमुळे पुण्यात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आता कोयता गँगच्या दादागिरीची दखल महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पुण्यात कोयता घेऊन काहीजण हिरोगिरी करत आहेत, त्या सर्वांना ठोकून काढणार, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.
खरं तर, पुण्यात कोयता गँगकडून होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यानंतर पोलीस प्रशासन आता प्रसिद्धीपत्रकांमध्ये कोयता शब्द न वापरता धारदार शस्त्र असा शब्दप्रयोग करत आहेत. असा आदेश सरकारनेच काढल्याची चर्चा आहे.
हेही वाचा- “तेव्हा थेट ब्रेकिंग न्यूज करा”, आणखी एका राजकीय भूकंपाबाबत बच्चू कडूंचं सूचक विधान!
याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असा कोणताही आदेश सरकारने काढला नाही. कोयता हातात घेऊन कुणी दादागिरी केली तर त्याला ठोकणार. त्याला सोडणार नाही. कोयता गँग वैगेरे काही नाही. काहीजण हिरोगिरी करत आहेत. त्या सर्वांना सरळ करू आणि ठोकून काढू, असा इशारा फडणवीसांनी दिला. तसेच याबाबतचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? शरद पवारांवरील गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचं आणखी एक मोठं विधान, म्हणाले…
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कोयता गँगची दखल घेतली होती. अजित पवारांनी कोयता गँगच्या गुन्हेगारीचा मुद्दा विधिमंडळात मांडला होता. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोयता गँगला थेट इशारा दिला आहे.