Devendra Fadnavis on Bajirao Peshwa: पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत अपुराच पोहचण्यासाठी इंग्रज व काही स्वकीयांना दोष दिला. त्यामुळे मोगलांनंतर आपल्याकडे थेट इंग्रजच आहले, असं आपल्याला वाटलं, असंही फडणवीस यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीचे काही दाखले दिले.
एनडीएमधील कार्यक्रमात अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होतं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
थोरल्या बाजीराव पेशव्यांसाठी वेग ही सर्वात मोठी रणनीती होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “थोरले बाजीराव पेशवे यांच्या लढाईत वेग ही सर्वात मोठी रणनीती असायची. जेव्हा मुघल साम्राज्याची सेना एका दिवसात आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची, तेव्हा थोरल्या बाजीरावांनी अशी सेना तयार केली होती की जी एका दिवसात ६० ते ८० किलोमीटर प्रवास करू शकायची. त्यांचं हे युद्ध कौशल्य होतं”, असं फडणवीस म्हणाले.
“जनरल मोंटॅगोमेरी हे दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले. त्यांनी जगातल्या योद्ध्यांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला. धोरणात्मकदृष्ट्या हे एक सर्वोत्तम युद्ध होतं, असा उल्लेख त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा केला आहे”, असाही दाखला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
आमच्या नायकांवर अन्याय झाला – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, ब्रिटिश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील काही नायकांवर अन्याय केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. “इंग्रजांनी व काही प्रमाणात स्वकीयांनीही आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच आपल्या इतिहासातून ‘डिलीट’ करून टाकला. त्यामुळे आपल्याला वाटलं की मुगलांनंतर थेट इंग्रजच इथे आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केलं. त्यामुळे आपल्या अनेक महानायकांचा विसर आपल्याला पडला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आज देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात आमच्या सर्व नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा यासाठी प्रयत्न होत आहेत. छत्रपती शिवरायांचे एक सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचा सुंदर पुतळा एनडीएमध्ये उभारला गेला. यापेक्षा उत्तम स्थान त्यांच्या पुतळ्यासाठी दुसरं कुठलं असूच शकत नाही. आमचं युद्धकौशल्य जिथे शिकवलं जातं, अशा ठिकाणी हा पुतळा लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे ठरवणाऱ्या समितीचं मी अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.