गुंतवणूकदाराची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील चार वर्षापासून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी येरवडा कारागृहात आहेत. दरम्यान, बँक घोटाळ्यातील एका आमदाराने कारागृहात डीएसकेंचा चावा घेतल्याची माहिती काही वेळापूर्वी सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती. दरम्यान, याबाबत येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले याच्यांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे. 

राणी भोसले म्हणाल्या, “डीएसके हे साधारण २० दिवसांपूर्वी घसरून पडले होते. त्या घटनेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यावर ससून रुग्णालयात उपचार करून पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असून ते सुखरूप आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर डीएसके बाबत चुकीची आणि खोडसाळपणे माहिती पसरविली गेली आहे. त्याबद्दल आम्ही शोध घेत आहोत.” 

काय होते फसवणूक प्रकरण ?

डी. एस. कुलकर्णी उद्योगसमुहाची मुदत ठेवींची जाहिरात वाचून अनेकांनी पैसे गुंतवले. या योजनेला रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी असल्याची माहिती देण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून शेकडो वयोवृद्ध नागरिक तसेच महिलांनी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर सुरुवातीला व्याज मिळाले. मात्र गेले वर्षभर व्याज मिळणे बंद झाले होते. मुदत ठेवींची मुदत पूर्ण होऊन ९० दिवस उलटले तरी गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर डीएसकेंवर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल करण्यात आले. डीएसकेंनी १४०० कोटींचे कर्जही बँकाकडून घेतले आहे.