पुणे : पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थिती आणि दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून, दरड आणि पूरप्रवण गावांतील कामे करण्यात आली आहेत. विविध शासकीय यंत्रणांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यात पाचशे आपदा मित्र आणि चारशे वन आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरी ८६२ मिलिमीटर, तर जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ९४० मिलिमीटर अशी पावसाची सरासरी आकडेवारी राज्य शासनाने निर्धारित केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागासाठीच्या पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्या.

जिल्ह्यात ८४ पूर, तर ७२ दरडप्रवण गावे आहेत. त्यातील भोर तालुक्यातील मौजे कोंढरी आणि धानवली या गावातील अनुक्रमे ४० आणि १२१ कुटुंबांना पावसाळ्यात आवश्यकतेनुसार जवळील शाळेत स्थलांतरित करण्यात येते. यंदा जास्त पावसाची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा, गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि जिल्हा पूर नियंत्रण आरखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

माळीण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील दरडप्रवण गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये २३ गावे दरडप्रवण म्हणून निश्चित करण्यात आली होती. या गावांमध्ये संरक्षणात्मक कामे करण्यासाठी ३६५.२३ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. या गावांपैकी मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज, तुंग आणि माळवाडी या पाच गावांमधील कामे पूर्ण झाली असून, भाेर तालुक्यातील धानवली गावाचे कामही पूर्ण झाले आहे. मुळशी तालुक्यातील भुसी आणि वेल्हा तालुक्यातील घोळ या दोन गावांमध्ये संरक्षणात्मक कामे करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून देण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यातील पाच गावांच्या पुनर्वसनासाठी ९० लाखांचा निधी वितरित करण्यात आला असून त्याबाबतची कार्यवाही संबंधित तहसीलदारांकडून सुरू करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली.

मौजे पोखरीअंतर्गत बेंढारवाडी आणि मौजे जांभोरीअंतर्गत काळवाडी या गावांमधील सपाटीकरणाच्या कामांसाठीही दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय २४ बर बोट, ५ लाइट टाॅवर, १२१ लाइफ जॅकेट, ९० दोरखंड, २७ सर्च लाइट, १० सॅटेलाइट फोन, ३०० सेफ्टी हेल्मेट, विविध आकारांचे ३३ तंबू आणि १३ फायल ब्लँकेट असे साहित्यही तालुके, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगरपालिका, गृहसंरक्षक दल, अग्निशामक दल, नगर परिषदा यांना पोहोचविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर शोध आणि बचाव गट स्थापन करण्यतात आला असून, या गटाकडे विविध साहित्य देण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या वेळी गावातील तलाठी आणि ग्रामसेवकांना उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाचशे आपदा मित्र आणि चारशे वन आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.- विठ्ठल बनोटे, प्रमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग