लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केल्याने खडकी बाजारातील गुंड राजा मारटकर याच्या मुलाने तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात घडली. घरात शिरून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.

सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, प्राजक्ता सुमीत पटेकर (वय 34, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सनी राजेंद्र मारटकर ( रा.गवळी वाडा, खडकी बाजार ) याच्यासह साथीदारावर खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात प्राजक्ता गंभीर जखमी झाल्या आहेत.

आणखी वाचा-ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना नाकारले! सुप्रिया सुळे यांचा आरोप

सुमीत पटेकर आणि त्याची पत्नी पवळे चौकातील अग्रवाल प्राईड सोसायटीत राहायला आहेत. गुरूवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सनी याने प्राजक्तापासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर प्राजक्त यांनी सुमीत याच्याशी विवाह केला. आरोपी सनी याच्या डोक्यात राग होता. सनी आणि साथीदार दुपारी अडीचच्या सुमारास घरात शिरला. त्यावेळी प्राजक्ता, त्यांची सासू आणि पती सुमीत गप्पा मारत होते. काही कळण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने सुमीत याच्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार पाहून प्राजक्ताने सुमीत याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सनीने कोयत्याने वार केले . गंभीर जखमी झालेल्या सुमीत याचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल , अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरा फरासखाना पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी सनी याचे वडील राजा मारटकर याची खडकी बाजारात दहशत होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. टोळी युद्धातून मारटकर याचा तंबी गोस आणि साथीदारांनी खून केला होता.